`डाऊ’ला घालवण्यात सरकारने टंगळ-मंगळ केली, तर सरकारच जाईल – संतवीर बंडातात्या कराडकर

क्रांतीदिनी… `डाऊ’ला `चले जाव’चा इशारा

पुणे, ९ ऑगस्ट (वार्ता)़ – `डाऊ’ कंपनीला आपला गाशा गुंडाळण्यास सांगण्यासाठी मी सरकारला विनंती करणार नाही, तर तंबी देणार. शासनाला सह्या व निवदने यांची भाषा कळत नाही, तर फक्‍त प्रतिकाराची भाषा कळते. `डाऊ’ घालवण्यात जर सरकारने टंगळ-मंगळ केली, तर सरकारच जाईल, असा निर्वाणीचा इशारा वारकरी संप्रदायातील संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी आज दिला. `डाऊ’ या रासायनिक खते बनवणार्‍या विदेशी कंपनीच्या विरोधात श्रीक्षेत्र देहू येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

सुमारे १५ मिनिटांच्या आपल्या घणाघाती भाषणात त्यांनी `डाऊ’, सरकार, पोलीस आदींचे वाभाडे काढले. या वेळी व्यासपिठावर लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती श्री. बी.जी. कोळसे-पाटील, श्री. विलास सोनवणे व अँड्. पद्मराजे शिरोळे, श्रीक्षेत्र देहू देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे, तसेच ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर, ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, शिंदे वसुली गावाचे सरपंच श्री. शांताराम पानमंद, ह.भ.प. राजाभाऊ चोपदार, देहू गावच्या सरपंच सौ. रत्‍नमाला करंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरुवर्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले, “लोकांच्या सुखासाठी मी `डाऊ’ कंपनी पेटवली आहे. त्यामुळे ती अहिंसाच आहे. `डाऊ’बाबत शासनाने सर्वांना अंधारात ठेवले. ५० हजार कीर्तनकारांनी जर निवडणुकीच्या वेळी त्यांची तोंडे उघडली, तर सरकारचे काय होईर्ल ? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपले नशीब अजमवावे”, असे मी त्यांना आव्हान देतो. पोलिसांवर आसुड ओढतांना ते म्हणाले, “डाऊ’वर मी हल्ला केल्याचे पोलिसांना लेखी लिहून दिले आहे. या वेळी माझ्याबरोबर वारकरी नव्हे, तर सिंहाचे छावे होते. हे सर्व करणारा मी आहे; मात्र पोलीस निरपराध लोकांना पकडत आहेत. साप सोडून भूई थोपटण्याची ही पोलिसांची सवयच आहे. आम्ही `डाऊ’ ही आंतरराष्ट्रीय कंपनी जाळू शकतो, तर पुढे तिच्या मालकालाही जाळण्यास कमी करणार नाही. या कंपनीला शासनाने बेकायदेशीर परवानगी दिली असतांना कायदेशीर आंदोलन कसले ?”, असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी `डाऊ’च्या विरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा मानस व्यक्‍त केला व भाषणाच्या शेवटी त्यांनी `डाऊ-भारत छोडो’, असा इशारा दिला. ह.भ.प. तनपुरे महाराज यांनी `डाऊ’चे देशातूनच उच्चाटन करण्याचे आवाहन केले. श्री. विलास सोनावणे यांनी `डाऊ’चा काळा इतिहास व शासनाची त्याच्या समर्थनातील भूमिका स्पष्ट केली. श्री. कोळसे-पाटील यांनी `डाऊ’ या परपीडेला संतभूमीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला, तर ह.भ.प. संदीपान महाराज यांनी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या नव्हे, तर सत्याच्या मागे जावे, असे सांगून `डाऊ’च्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. श्री देहू देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे व श्री आळंदी देवस्थानच्या वतीने ह.भ.प. राजाभाऊ चोपदार यांनी दोन्ही संस्थांच्या वतीने आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरूच्चार केला. याशिवाय अनेक संघटनांनी या वेळी `डाऊ’च्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला. प्रास्ताविक ह.भ.प. तनपुरे महाराजांनी केले. सूत्रसंचालन व्यसनमुक्‍त युवक संघटनेचे अध्यक्ष श्री. सचिन शिंदे, तर आभार श्री धैर्यशील देशमुख यांनी मानले.

क्षणचित्रे
१. कार्यक्रमास मोठा पोलीस बंदोबस्त होता.
२. भर पावसातही वारकरी गुरुवर्य बंडातात्यांचे भाषण शांतपणे ऐकत होते.
३. वारकरी व व्यसनमुक्‍त युवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हाते.
४. `क्रांतीवीर बंडातात्या आप आगे बढो, हम तुम्हारा साथ है’ अशी उत्स्फूर्त घोषणा देण्यात येत होती.

मित्रांना पाठवा | 35 – वाचक संख्या |  छापील प्रत

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

Leave a Reply