नवी दिल्ली, ७ ऑगस्ट (प्रे.ट्र./वृत्तसंस्था) – अमरनाथ देवस्थानच्या जमीन प्रकरणात भाजप देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. आज भाजपचे वरिष्ठ नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जम्मूमधील परिस्थितीबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष श्री. राजनाथ सिंग, श्री. मुरली मनोहर जोशी, श्रीमती सुषमा स्वराज व श्री. अरुण जेटली हे उपस्थित होते. अमरनाथ मुद्यावरून भाजप मर्यादित आंदोलन छेडण्याच्या तयारीत होता; मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते मान्य नाही. हा मुद्दा चिघळला, तर विघटनवादी संघटना त्याचा फायदा उठवू शकतात, असे भाजपला वाटते; मात्र संघाला हे मान्य नाही. `आतापर्यंत या मुद्यावर हिंदूंचे रक्त सांडले आहे. असे असतांना आता माघार घेणे बरे नाही’, असे संघाला वाटते. काल रात्री उशिरा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. “वादग्रस्त जमीन पुन्हा अमरनाथ देवस्थान मंडळाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही आम्ही नाकारत नाही”, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री श्री. प्रणव मुखर्जी यांनी केले. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ सदस्य उपस्थित होते.
श्रीनगरमध्ये बंद
आज श्रीनगरमध्ये बंद पाळण्यात आला. शहरात विविध ठिकाणी जमावाने सुरक्षाजवानांवर दगडफेक केली. विघटनवादी `जेकेएल्एफ्’या संघटनेचे नेते यासीन मलीक यांनी अमरनाथ संघर्ष समितीच्या भूमिकेला विरोध केला असून गेले दोन दिवस ते उपोषणाला बसले आहेत. यासीन मलीक हे हृदयाच्या रोगाने पीडित आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त पसरताच श्रीनगरमध्ये हिंसाचार उसळला.
राज्यपालांकडून चार सदस्यीय समितीची स्थापना
काश्मीर खोर्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आज राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांनी चार सदस्यीय समितीची स्थापना केली. ही समिती अमरनाथ संघर्ष समितीच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. यापूर्वी श्री. व्होरा यांनी समितीला चर्चेसाठी निमंत्रित केले होते; मात्र समितीने चर्चेची मागणी फेटाळली आहे. राज्यपालांनी स्थापन केलेल्या नवीन समितीशी अमरनाथ संघर्ष समितीचे सदस्य चर्चा करणार का, असा प्रश्न समितीचे प्रवक्ते श्री. लीलाकरण शर्मा यांना विचारल्यावर ते म्हणाले, “जम्मूमधील लोकांच्या भावनांचा विचार करून ही नवीन समिती काय प्रस्ताव ठेवणार, याबाबत अभ्यास केला जाईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल.”


