शांतीचा संदेश देणार्‍या संतांना क्रांतीसाठी भाग पाडू नका !

धर्मावरील आक्रमणांच्या विरोधात संतांच्या माध्यमातून हिंदूंना दिशा देण्याचे कार्य करणार्‍या `भारत जागृती मोर्चा’चे अभिनंदन !

  

`भारत जागृती मोर्चा’तर्फे आयोजित `विशाल हिंदु महासभे’त संतांचे आवाहन !

मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु धर्म, देवता व संत यांना जाणीवपूर्वक बदनाम करणार्‍यांना आता हिंदूंनी ओळखले पाहिजे. संतांच्या माध्यमातून सुरू असलेल्या धर्मप्रसाराच्या कार्यामुळे व्यथित झालेले साम्यवादी व हिंदुद्वेष्टे विविध षडयंत्रे रचून संतांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. समाजाचे श्रद्धास्थान व हिंदूंची अस्मिता असलेल्या आणि शांतीचा संदेश देणार्‍या संतांना षडयंत्रांत अडकवून क्रांतीस भाग पाडू नका, असा इशारा येथील विशाल हिंदु महासभेत उपस्थित संतांनी दिला.

 

सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत झालेल्या या महासभेला देशातील २० हून अधिक संत व महाराष्ट्र, तसेच अन्य राज्ये यांतील ३ हजारांहून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भारत जागृती मोर्चा, विश्‍व हिंदु परिषद अंतर्गत बजरंग दल यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आले होते.

महाराष्ट्राकडे भारतमातेच्या रक्षणाची जबाबदारी ! – डॉ. सुनील शास्त्रीजी महाराज, छत्तीसगड
सृष्टीची निर्मिती करतांना ब्रह्मदेवाने महाराष्ट्रासारख्या संतभूमीकडे देशाच्या रक्षणाची जबाबदारी दिली आहे. भारताच्या राज्यघटनेनुसार संस्कृती व शिक्षण यांच्याही आधी हिंदूंना धर्मसंस्काराचा अधिकार डॉ. आंबेडकरांनी दिला आहे. तीत बौद्ध, शीख व जैन यांना मिळून हिंदु म्हटले गेले आहे. यांना जो वेगळे करतो, तो खरा घटनाद्रोही आहे, असे छत्तीसगड येथील डॉ. सुनील शास्त्रीजी महाराज या वेळी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, “आज या हिंदुस्थानात मोगल व इंग्रज यांच्यापेक्षा जास्त अत्याचार राज्यकर्ते हिंदूंवर करत आहेत. सर्वधर्मसमभावाच्या गोंडस नावाखाली हिंदूंना नष्ट करण्याचे काम सुरू आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासारखी व्यक्‍ती `छत्रपती शिवाजी महाराज हिंदु नव्हते’, `हनुमान माकड व नग्न होता’, अशा प्रकारची वक्‍तव्ये करते. तिला सांगावेसे वाटते की, जे स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, त्यांच्यापेक्षा लंका जाळणारा हनुमान कित्येक पटींनी सरस आहे.”

इतिहासात संतांवर आरोप झाले नाहीत, ते आज होत आहेत ! – स्वामी विश्‍वेश प्रपन्नचार्यजी, वृंदावन
सत्ययुग, त्रेतायुग व द्वापारयुग यांमध्ये किंवा मोगल वा इंग्रज यांच्या राजवटींत संतमहात्म्यांवर कोणी आरोप केले नाहीत; पण ते होत आहेत. जे इतिहासात घडले नाही, ते आजच्या राज्यकर्त्यांनी करून दाखवले. प.पू. बापूंना आरोपी ठरवणार्‍यांचा चांगलाच समाचार घ्या.

कोट्यवधी लोकांची आस्था व श्रद्धा जिवंत असेपर्यंत संतांना कोणी रोखू शकत नाही !
- जय प्रभू विजयजी महाराज (जैन मुनी)
प्रत्येक संत हे सर्वसामान्यांचे जीवन स्वच्छ, स्वस्थ, मजबूत व निर्व्यसनी होण्यासाठीच कार्य करत असतात. मातेचा दर्जा दिलेल्या या भारत देशात संतांच्या चरणी जीवन समर्पित करून शांतीचा अनुभव घेणे, यातच खरे सार्थक आहे. केवळ दाढी, प्रवचन किंवा वेशभूषा करून संत होता येत नाही, तर आपल्या आचरणातून आपले संतत्व सिद्ध होते. संतांना तुमच्या संपत्तीची नाही, तर तुमच्या भक्‍तीची गरज आहे. कृषी व ऋषी यांचे राज्यकर्त्यांनी हाल केले आहेत. आज प्रत्येक हिंदुद्वेष्टा व राज्यकर्ता याला भारत हा संतविरहित हवा आहे. आपण अजून भाषेची गुलामीही सोडलेली नाही. जिथे रामाला १४ वर्षांचा वनवास भोगायला लागला, तिथे संतांना भोगावा लागणे क्रमप्राप्‍त आहे. घाबरू नका. आता हा त्रास १४ महिनेही चालणार नाही. या निमित्त संघटित झालेल्या हिंदूंनी देवनार येथे अत्याधुनिक होत असलेल्या कत्तलखान्याला विरोध करावा.

प.पू. आसारामजी बापूंसंबंधी पीतपत्रकारिता सुरू आहे !- उमेश गायकवाड, विहिंपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष
अद्याप घटनेची चौकशीही सुरू झालेली नाही. तेथे दोषारोप ठेवणे दूरच राहिले. असे असतांना प्रसारमाध्यमांनी मात्र प.पू. आसारामजी बापूंना आरोपी जाहीर करून त्यांचा एकेरी उल्लेख करणे सुरू केले. ही पीतपत्रकारिता आहे.

भाजप सर्व शक्‍तीनिशी प.पू. बापूंच्या पाठीशी उभा आहे ! – आमदार गोपाळ शेट्टी, भाजप
भारतीय जनता पक्ष प.पू. आसारामजी बापूंच्या मागे सर्वशक्‍तीनिशी उभा आहे. पक्ष राजकारण म्हणून नाही, तर संत व धर्म यांच्याप्रती अस्मिता म्हणून प.पू. बापूंसोबत रहाणार आहे.

भक्‍तांची जळती मशाल या सभेत बघायला मिळत आहे ! – आमदार मंगलप्रसाद लोढा, भाजप
संतांच्या रूपाने आपल्याला देवाचे दर्शन होते. अशा प्रकारे संतसान्निध्याचा लाभ कधीतरी होतो. धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संतांच्या रक्षणाचे कार्य आमचे आहे व त्यांच्या आशीर्वादानेच ते होऊ शकते. केवळ संतांच्या आगमनामुळे कोणताही प्रचार न करता उपस्थित भक्‍तांच्या रूपाने जळती मशाल मला बघायला मिळत आहे. सर्व जैन साधू केवळ भाषणाने नाही, तर मनाने या आंदोलनात सहभागी आहेत.

आंदोलन उद्याही सुरूच रहाणार !
हे आंदोलन उद्यापर्यंत आझाद मैदान येथे सुरूच ठेवण्याचा निर्णय `भारत जागृती मोर्चा’ने सायंकाळी जाहीर केला. त्यानंतर हे आंदोलन पुढे आंध्रप्रदेश, भुवनेश्‍वर, दिल्ली व शेवटी गुजरातमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले.

क्षणचित्रे
* वृंदावन येथील स्वामी विश्‍वेश प्रपन्नचार्यजी यांनी भजन सुरू केले तेव्हा उपस्थित श्रोते जागेवर उभे राहून नाचू लागले.
* `हरि ओम’च्या स्वरात उपस्थित संतांचा सन्मान करण्यात आला.
* संतांच्या क्षात्रतेजयुक्‍त वाणीने प्रभावित झालेले हिंदू टाळया वाजवून व घोषणा देऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढवत होते.
* कार्यस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
* बजरंग दलाचे कार्यकर्ते सभेला उपस्थित रहाणार्‍यांची प्रवेशद्वाराजवळ सुरक्षेच्या कारणास्तव तपासणी करत होते व त्यांनी कार्यस्थळाच्या चौफेर संरक्षणाचे कार्य चोख बजावले. (हिंदुबहुल राष्ट्रात हिंदूंच्या कार्यक्रमासाठी अशी संरक्षणयंत्रणा उभारावी लागते, हे हिंदूंचे दुर्दैव ! – संपादक)
* कार्यस्थळी हिंदूंना प्रेरित करण्याबरोबरच धर्मावर होत असलेल्या आक्रमणांच्या विरोधात जागृत करणारे फलक भारत जागृती मोर्च्याच्या वतीने लावण्यात आले होते.
* कार्यस्थळी हिंदु धर्मावरील आक्रमणांच्या विरोधात माहिती देणारी पुस्तिका विनामूल्य वाटप करण्यात आली.
* या कार्यक्रमाचे संयोजक श्री. अजय पटेल, मुंबई येथील श्री. दिनेश पाटील यांनी कमी कालावधीत उत्तम नियोजन केले. तसेच या वेळी उपस्थित स्वयंसेवकांच्या चेहर्‍यावर धर्माभिमान व नम्रता यांचा सुंदर मिलाप दिसून आला.

या सभेच्या दरम्यान देण्यात आलेल्या घोषणा
* आश्रममें आतंक फैलाना बंद करो !
* आश्रममें आतंक फैलानेवालेको जेलमें बंद करो !
* आश्रमवासी हत्यारे नही, आतंकवादी हत्यारे है !

सभेत हात उंचावून केलेले जाहीर निषेध
* ज्या राजकीय पक्षांनी प.पू. आसारामजी बापू यांना बदनाम करण्याचा प्रयत्‍न केला, त्या राजकीय पक्षांचा निषेध !
* प.पू. बापूंना पोलीस पकडत आहेत, आश्रमवासियांनी स्थानिक लोकांना मारहाण केली, असे खोटे वृत्त प्रसिद्ध करणारी आणि प.पू. बापंूंचा एकेरी उल्लेख करणारी खाजगी वृत्तवाहिनी `आजतक’चा निषेध !
* घटनेच्या दुसर्‍या दिवशीचा अंक प.पू. बापूंच्या विरोधात प्रसिद्ध करणार्‍या `दैनिक गुजरात समाचार’चा निषेध !
* प.पू. बापूंना राक्षस संबोधणार्‍या गुजरातमधील `दैनिक संदेश’चा निषेध !

कार्यक्रमाला उपस्थित अन्य संत व मान्यवर
दिल्लीतील उमेयानंदजी महाराज; तपोवन, गुजरात येथील अवधाकिशोर महाराज; दिल्लीतील कृपालजी महाराज; गणेशपुरी, मुंबई येथील मौनीबाबा; वांद्रे, मुंबईतील रामगिरी महाराज; आग्रा येथील स्वामी विद्यानंद सरस्वती; मुंबईचे माजी उपमहापौर श्री. रमेशजी मेढेकर; भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार श्री. गोपाळराव शेट्टी; आझादी बचाओ आंदोलनाचे अध्यक्ष डॉ. राजीव दीक्षित, सनातन संस्थेचे श्री. काणे


धर्मांतर बंद पडल्याने प.पू. आसारामजी बापू यांच्या विरोधात षडयंत्र !प.पू. आसारामजी बापू यांच्या कार्यामुळे अनेक ठिकाणी धर्मांतर मोठ्या प्रमाणावर बंद झाले. छिंदवाडा हे त्यांपैकीच एक गाव. त्यामुळे व्यथित झालेल्या समाजकंटकांकडून बालकांना मारण्याचे षडयंत्र रचले गेले. बापूंचा एकेरी उल्लेख करून त्यांना तपासापूर्वीच गुन्हेगार ठरवणारे त्यांच्या गोरगरिबांसाठी चाललेल्या कार्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ज्या मुलांची दुर्दैवी हत्या झाली, त्यांच्या आईवडिलांची बापूंविषयी कोणतीही तक्रार नाही. असे असतांना प्रसारमाध्यमांनी त्यांना `हत्यारा’ कसे घोषित केले ? मग देशाच्या मानबिंदूवर हल्ला करणार्‍या अफझलला फाशी न देता अभय देणार्‍या राज्यकर्त्यांना काय म्हणावे, हेही पत्रकारांनी समाजाला सांगावे, असे आव्हान उपस्थित संतांनी दिले. तसेच या प्रकरणाची चौकशी पैशांसाठी विकणार्‍या केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडे नको, तर वकील, पत्रकार यांच्या निष्पक्ष समितीकडून करा, अशी मागणी उपस्थित संतांनी या वेळी केली.

आंदोलनाला येणारे सर्व हिंदुत्ववादी सकाळपासून सायंकाळपर्यंत अन्न ग्रहण करणार नाहीत.

 |  मित्रांना पाठवा |  67 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

 

.