संत तुकारामांची तपोभूमी नष्ट करू पहाणार्या राज्यकर्त्यांवर आसूड ओढणार्या `आपला वार्ताहर’चे अभिनंदन !
पुणे – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या तपोभूमीवर चाकण (जिल्हा पुणे) येथे भामचंद्र डोंगरावर `डाऊ केमीकल्स’ या कंपनीचा रासायनिक प्रकल्प होऊ घातलेला आहे. `या स्थळी असा प्रकल्प होणे, ही संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीची विटंबना आहे.’, अशी भावना समस्त वारकरी व भाविक यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. `भामचंद्र डोंगराचा परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करावा’, अशी त्यांची मागणी आहे. तिला अनुसरून `दैनिक वार्ताहर’ने ३० जुलै रोजी संपादकीय प्रसिद्ध केले आहे. वारकरी व भाविक जनतेच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी त्या संपादकियातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
संतांच्या तीर्थस्थानांचे पावित्र्य अबाधित राखण्याच्या कर्तव्याची अपेक्षा जॉर्ज बुशकडून करायची का ?
डाऊ प्रकल्प नकोच. निदान सरकारने ठरवलेल्या जागी तर नकोच नको; कारण हा प्रकल्प म्हणजे पर्यावरणाच्या हानीबरोबरच महाराष्ट्रातील भाविकांचा भक्तीभाव व श्रद्धा यांवर होणारा हल्ला आहे. महाराष्ट्राचे राज्यकर्ते स्वत:ला ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा असल्याचे सांगतात. दरवर्षी पंढरीच्या वारीत टाळ व चिपळया घेऊन सहभागी होतात. मुख्यमंत्री आषाढीला, तर उपमुख्यमंत्री कार्तिकीला विठ्ठलाची पूजा करतात. संत तुकोबारायांच्या पायावर नतमस्तक होतात. पंढरीची वारी व वारकरी ही आमची परंपरा असल्याचे सांगतात. त्यामुळे यांनी संतांच्या तीर्थस्थानांचे पावित्र्य अबाधित राखण्याचे कर्तव्य करणे, ही अपेक्षा त्यांच्याकडून करायची कि सातासमुद्रापलीकडे असलेल्या जॉर्ज बुशकडून ?
बंडातात्यांचे निधड्या छातीचे नेतृत्व व बाणेदारपणा !
वारकरी व जनता यांचा प्रखर विरोध असतांना महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी या रासायनिक प्रकल्पाला परवानगी दिली व काम सुरू करण्यास पोलीस बंदोबस्तही दिला. महाराष्ट्र धर्माची संस्कृती सांगणार्या राज्यकर्त्यांनी वारकर्यांच्या विरोधात पोलिसांची फौज लावली; पण विष्णुदासांनी आपल्या शक्तीची झलक दाखवत गेल्या शुक्रवारी प.पू. बंडातात्या कराडकर व काही वारकरी यांसह `डाऊ केमिकल्स’ला दणका दिला. स्वत:ची व्रतडी वाचवण्यासाठी कुणाला तरी पकडायचे नि तुरुंगात टाकायचे, हा प्रकार पोलिसांनी इथेही केला. बंडातात्यांना हे कळाल्यावर ते स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत स्वत:ला अटक करून घेण्याची तयारी दर्शवली व स्थानिक ग्रामस्थांना सोडून देण्याची विनंती केली. बंडातात्यांचा हा बाणेदारपणा लक्षवेधी व आंदोलन करणार्या संघटनांच्या नेत्यांनी धडा घेण्यासारखा आहे. लोकांनी लढावे, कार्यकर्त्यांनी मरावे व नेत्यांनी मौज मारावी, असे सर्रास आढळते. बंडातात्यांनी मात्र निधड्या छातीने लढाईचे नेतृत्व केले.
कायदा हा सुव्यवस्था निर्माण होण्यासाठीच हवा !
कायदा हा सुव्यवस्था निर्माण होण्यासाठीच हवा. सरकारच कायद्याच्या जोरावर गरिबांच्या न्याय्य हक्कावर वरवंटा फिरवू लागले, लोकांची आराध्यस्थाने भुईसपाट करू लागले, तर सुव्यवस्था कशी निर्माण होईल ? कोट्यवधी वारकर्यांचे श्रद्धास्थान असलेल्या तुकोबारायांच्या तपोभूमीवर खुलेआम आक्रमण करायचे व विरोध करणार्यांना कायदा व सुव्यवस्थेचे भय दाखवायचे, ही कुठली सुव्यवस्था ? असला मनमानी, समाजविरोधी, शांतताविरोधी कायदा जनता कशी मानेल ?
राज्यकर्त्यांच्या अत्याचाराला बंडातात्यांनी दिलेले आव्हान स्फूर्तीदायी !
विकासाच्या नावाखाली असाहाय्य व गरीब शेतकर्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम धडाक्यात सुरू आहे. याला विरोध करण्यासाठी कायद्याच्या हत्याराचा वापर होत आहे. या पार्श्वभूमीवर प.पू. बंडातात्या कराडकर महाराज यांनी राज्यकर्त्यांच्या जुलमी अत्याचाराला दिलेले आव्हान जबरदस्त व सर्वांना स्फूर्तीदायी आहे.
| मित्रांना पाठवा | 2 – वाचक संख्या | छापील प्रत
|