`डाऊ केमीकल्स’ प्रकल्प : संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीची विटंबना !

संत तुकारामांची तपोभूमी नष्ट करू पहाणार्‍या राज्यकर्त्यांवर आसूड ओढणार्‍या `आपला वार्ताहर’चे अभिनंदन !

 

पुणे – जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांच्या तपोभूमीवर चाकण (जिल्हा पुणे) येथे भामचंद्र डोंगरावर `डाऊ केमीकल्स’ या कंपनीचा रासायनिक प्रकल्प होऊ घातलेला आहे. `या स्थळी असा प्रकल्प होणे, ही संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीची विटंबना आहे.’, अशी भावना समस्त वारकरी व भाविक यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. `भामचंद्र डोंगराचा परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करावा’, अशी त्यांची मागणी आहे. तिला अनुसरून `दैनिक वार्ताहर’ने ३० जुलै रोजी संपादकीय प्रसिद्ध केले आहे. वारकरी व भाविक जनतेच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी त्या संपादकियातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.

संतांच्या तीर्थस्थानांचे पावित्र्य अबाधित राखण्याच्या कर्तव्याची अपेक्षा जॉर्ज बुशकडून करायची का ?
डाऊ प्रकल्प नकोच. निदान सरकारने ठरवलेल्या जागी तर नकोच नको; कारण हा प्रकल्प म्हणजे पर्यावरणाच्या हानीबरोबरच महाराष्ट्रातील भाविकांचा भक्‍तीभाव व श्रद्धा यांवर होणारा हल्ला आहे. महाराष्ट्राचे राज्यकर्ते स्वत:ला ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा असल्याचे सांगतात. दरवर्षी पंढरीच्या वारीत टाळ व चिपळया घेऊन सहभागी होतात. मुख्यमंत्री आषाढीला, तर उपमुख्यमंत्री कार्तिकीला विठ्ठलाची पूजा करतात. संत तुकोबारायांच्या पायावर नतमस्तक होतात. पंढरीची वारी व वारकरी ही आमची परंपरा असल्याचे सांगतात. त्यामुळे यांनी संतांच्या तीर्थस्थानांचे पावित्र्य अबाधित राखण्याचे कर्तव्य करणे, ही अपेक्षा त्यांच्याकडून करायची कि सातासमुद्रापलीकडे असलेल्या जॉर्ज बुशकडून ?

बंडातात्यांचे निधड्या छातीचे नेतृत्व व बाणेदारपणा !
वारकरी व जनता यांचा प्रखर विरोध असतांना महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी या रासायनिक प्रकल्पाला परवानगी दिली व काम सुरू करण्यास पोलीस बंदोबस्तही दिला. महाराष्ट्र धर्माची संस्कृती सांगणार्‍या राज्यकर्त्यांनी वारकर्‍यांच्या विरोधात पोलिसांची फौज लावली; पण विष्णुदासांनी आपल्या शक्‍तीची झलक दाखवत गेल्या शुक्रवारी प.पू. बंडातात्या कराडकर व काही वारकरी यांसह `डाऊ केमिकल्स’ला दणका दिला. स्वत:ची व्रतडी वाचवण्यासाठी कुणाला तरी पकडायचे नि तुरुंगात टाकायचे, हा प्रकार पोलिसांनी इथेही केला. बंडातात्यांना हे कळाल्यावर ते स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत स्वत:ला अटक करून घेण्याची तयारी दर्शवली व स्थानिक ग्रामस्थांना सोडून देण्याची विनंती केली. बंडातात्यांचा हा बाणेदारपणा लक्षवेधी व आंदोलन करणार्‍या संघटनांच्या नेत्यांनी धडा घेण्यासारखा आहे. लोकांनी लढावे, कार्यकर्त्यांनी मरावे व नेत्यांनी मौज मारावी, असे सर्रास आढळते. बंडातात्यांनी मात्र निधड्या छातीने लढाईचे नेतृत्व केले.

कायदा हा सुव्यवस्था निर्माण होण्यासाठीच हवा !
कायदा हा सुव्यवस्था निर्माण होण्यासाठीच हवा. सरकारच कायद्याच्या जोरावर गरिबांच्या न्याय्य हक्कावर वरवंटा फिरवू लागले, लोकांची आराध्यस्थाने भुईसपाट करू लागले, तर सुव्यवस्था कशी निर्माण होईल ? कोट्यवधी वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या तुकोबारायांच्या तपोभूमीवर खुलेआम आक्रमण करायचे व विरोध करणार्‍यांना कायदा व सुव्यवस्थेचे भय दाखवायचे, ही कुठली सुव्यवस्था ? असला मनमानी, समाजविरोधी, शांतताविरोधी कायदा जनता कशी मानेल ?

राज्यकर्त्यांच्या अत्याचाराला बंडातात्यांनी दिलेले आव्हान स्फूर्तीदायी !
विकासाच्या नावाखाली असाहाय्य व गरीब शेतकर्‍यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम धडाक्यात सुरू आहे. याला विरोध करण्यासाठी कायद्याच्या हत्याराचा वापर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर प.पू. बंडातात्या कराडकर महाराज यांनी राज्यकर्त्यांच्या जुलमी अत्याचाराला दिलेले आव्हान जबरदस्त व सर्वांना स्फूर्तीदायी आहे.

 |  मित्रांना पाठवा |  2 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : याबाबत बलाढ्य हिंदुत्त्ववादी संघटना काय करणार आहेत?

सिमीवरील बंदी वाढवता येणार नाही – विशेष लवाद न्यायालय

नवी दिल्ली, ३१ जुलै – स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्याच्या निर्णयासंबंधीची वस्तूस्थिती सरकारने नव्याने पडताळावी, अशी सूचना येथील विशेष लवाद न्यायालयाने केंद्र सरकारला केली. “या संघटनेच्या केवळ इतिहासावरून तिच्यावर घालण्यात आलेली बंदी सरकारला वाढवता येणार नाही. नवीन पुरावे द्या”, असे लवादाच्या न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी म्हटले आहे.

(कित्येक देशविघातक कारवायांत सिमी गुंतली असल्याची वृत्ते सातत्याने प्रसिद्ध होत असतात. त्यांचा गांभीर्याने अभ्यास करून सिमीच्या विरोधातील बंदी वाढवण्यासाठी केंद्र सरकार पुरावे कधी सादर करणार आहे ? – संपादक) केंद्र सरकारने संघटनेवर घातलेल्या बंदीला आव्हान देणारी याचिका सिमीने विशेष लवाद न्यायालयात दाखल केली आहे. सिमीवरील बंदीच्या संदर्भात नव्याने अधिसूचना काढतांना शासनाने वस्तूस्थितीची पडताळणी करून ती काढावी. तिच्यातील कारणे ही लवादाच्या दृष्टीने समाधानकारक असण्याची गरज आहे, असे न्या. मित्तल यांनी म्हटले आहे.

देशभरात सिमीचे ४०० पूर्णवेळ कार्यकर्ते, तर २० हजार सदस्य ! मुंबई – देशभरात सिमीचे ४०० पूर्णवेळ कार्यकर्ते कार्यरत आहेत. त्यांना `अन्सार’, असे संबोधले जाते. तसेच देशभर सिमीचे २० हजार सदस्य असून त्यांना `इख्वान’ म्हणतात, अशी माहिती पोलीस अटकेत असलेला सिमीचा प्रमुख सफदर नागोरी याच्याकडून पोलिसांना मिळाली आहे. २००१ नंतर सिमीत फूट पडली. आता सिमीचे शहीद बदर फलाह गट व सफदर नागोरी गट, असे दोन गट देशभर कार्यरत आहेत. शहीद बदर फलाह याला उत्तरप्रदेशमध्ये २००१ साली अटक करण्यात आली होती, तर सफदर नागोरी याला मार्च महिन्यात पोलिसांनी उज्जैन येथे पकडले होते. २००१ साली सिमीवर बंदी घातल्यापासून तो फरारी होता. नागोरीकडे सिमीचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी होती. त्यासाठी त्याने पाकिस्तान, तसेच पॅलेस्टाईनमधील हम्मास या आतंकवादी संघटनेशी संबंध प्रस्थापित केले होते.

 |  मित्रांना पाठवा |  5 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : देशद्रोही मुसलमान

गुजरातमधील बाँबस्फोटांमागे पाकचा हात असल्याचा पोलिसांना संशय

नवी दिल्ली, ३१ जुलै (प्रे.ट्र./ वृत्तसंस्था) – २६ जुलै रोजी गुजरात राज्यात अहमदाबाद येथे झालेले बाँबस्फोट व सूरतमध्ये सापडलेले जिवंत बाँब या प्रकरणांत पाकिस्तानचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. नवी मुंबई येथून चोरून नेण्यात आलेल्या दोन गाड्यांच्या नंबरप्लेटचा शोध पोलिसांना कॅमेर्‍यांच्या मदतीने लागला आहे. स्फोटके वाहून नेणार्‍या चार गाड्यांपैकी एका गाडीचे छायाचित्र हाती लागले आहे, असे गुजरात पोलिसांनी म्हटले आहे. पुणे येथील टोल नाक्यावर बसवलेल्या `क्लोज सर्कीट’ कॅमेर्‍यामध्ये या गाडीचे छायाचित्र मिळाले आहे.

पुढील तपासासाठी हे छायाचित्र मुंबई व अहमदाबाद येथील पोलिसांना पाठवण्यात आले आहे. जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात नवी मुंबई येथून या गाड्या चोरण्यात आल्या व नंतर पुणेमार्गे गुजरातमध्ये नेण्यात आल्या. आज सुरतनजिक असलेल्या अंकेश्‍वर येथे आणखी एक जीवंत बाँब सापडल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण कायम आहे.

बाँबस्फोट प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोठ्या प्रमाणात मोहीम
अहमदाबाद – येथील बाँबस्फोट प्रकरणी शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मोहीम उघडली आहे. संयुक्‍त पोलीस महासंचालक श्री. एच्.पी. सिंग म्हणाले, “या प्रकरणी पोलिसांच्या वेगवेगळया पथकांनी शहराच्या वेगवेगळया भागांत तपास केला व अनेक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्व पथकांचा अहवाल अजून एकत्रित करायचा आहे.” गुजरात पोलिसांना मदत करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुंबई, हैद्राबाद, राजस्थान, उत्तरप्रदेश व दिल्ली या ठिकाणच्या पथकांना गुजरातमध्ये पाचारण करण्यात आले आहे. काल भरूच जिल्ह्यात सिमी संघटनेशी संबंधित दहा जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अहमदाबाद येथील पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने काल रात्री काही जणांना अटक केली आहे. सूरतमध्येही पोलिसांनी या प्रकरणी २८० जणांची चौकशी करून ९० जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून सध्या त्याविषयीची माहिती उघड करणार नाही, असे पोलीस आयुक्‍त आर्.एम्.एस्. ब्रार यांनी सांगितले. दरम्यान आज सकाळी भरूच जिल्ह्यातील अंकलेश्‍वर भागात बाँब ठेवल्याची अफवा पसरली; परंतु या ठिकाणी बाँबशोधक पथक व श्‍वानपथक यांना पाचारण करण्यात आल्यानंतर या भागात बाँब नसल्याचे उघड झाले.

गुजरातमधील बाँबस्फोटांत स्थानिक लोकांचा सहभाग
अहमदाबाद – गुजरातमध्ये झालेले बाँबस्फोट व सूरतमध्ये बाँब पेरण्यात स्थानिक लोकांचा सहभाग असल्याचे मत गुजरात सरकार व तेथील पोलिसांनी व्यक्‍त केले आहे. पोलीस आयुक्‍त आर्.एम्.एस्. ब्रार याविषयी म्हणाले, “जरी हा कट वरच्या स्तरावर रचण्यात आला असला, तरी स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हे होणे शक्य नाही. जागा निवडणे, बाँब पेरणे, स्फोटके वाहून नेणे हे स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय शक्य नाही.” बाँबस्फोट प्रकरणी मदत करणार्‍या स्थानिक लोकांचा शोध घेण्यासाठी गुजरात व सूरतमधील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मोहीम उघडली आहे.

 |  मित्रांना पाठवा |  3 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत