२ ठार १२ जखमी
बंगळुरू, २५ जुलै (प्रे.ट्र. / वृत्तसंस्था) – माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ख्याती असणार्या बंगळुरू शहरात आज एकामागून एक ९ बाँबस्फोट झाले आणि देश हादरला.
(नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे `दहशतवाद्यांकडून बाँबस्फोट होणारा पहिल्या क्रमांकाचा देश’, अशी नवी ओळख झालेल्या भारतात आणखी वेगळे काय घडणार ? – संपादक) या बाँबस्फोटांनी दोन वर्षांपूर्वी भारतीय विज्ञान केंद्रावर झालेल्या बाँबस्फोटाची आठवण करून दिली.
आज दुपारी १.३० ते १.४५ या कालावधीत ७ ठिकाणी बाँबस्फोट झाले. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता म्हैसूर रोडवर असलेल्या गोपालन मॉलमध्ये आठवा बाँबस्फोट झाला. या साखळी बाँबस्फोटांत २ जण ठार झाले असून १२ जण जखमी झाले आहेत. हे बाँबस्फोट कमी शक्तीशाली होते. (जनतेचा जीव घेणारे बाँबस्फोट म्हणे सौम्य प्रकारचे ! – संपादक) शहरात घातपात घडवून आणण्यापेक्षा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा बाँबस्फोट घडवून आणण्यामागे हेतू होता. “मदीवाला येथे झालेल्या बाँबस्फोटात १ महिला ठार झाली”, अशी माहिती पोलीस आयुक्त श्री. शंकर बिद्री यांनी दिली. रुग्णांना सेंट जॉन व मल्ल्या रुग्णालयांत हालवण्यात आले आहे.
बाँबस्फोट झालेली ठिकाणे
हे बाँबस्फोट अदूगोडी, मदीवाला, नयनदहल्ली, म्हैसूर रोड, रिचमंड सर्कल, पंथरपल्ल्या व विठ्ठल मल्ल्या रोडच्या परिसरात झाले. ही सर्व ठिकाणे शहरातील दक्षिण भागात आहेत. “पहिले चार बाँबस्फोट होसूर रोड व मदीवाला या परिसरात झाले. त्यानंतरचे ३ बाँबस्फोट नयनदहल्ली, विठ्ठल मल्ल्या रोड व रिचमंड सर्कल येथे झाले”, अशी माहिती शहराचे आयुक्त श्री. शंकर बिद्री यांनी पोलिसांना दिली. मदीवाला परिसर हा शहरातील सर्वांत गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. मदीवालातील बसस्थानकात हा स्फोट झाला. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता गोपालन मॉल व उत्तर बंगळुरूमध्ये दोन बाँबस्फोट झाले.
बाँबस्फोटांनंतर शहरात दहशतीचे वातावरण !
बाँबस्फोटांनंतर शहरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. (बाँबस्फोट रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न काढता बाँबस्फोटांनंतर प्रतिबंधात्मक सुरक्षाव्यवस्था वाढवणारे सरकार म्हणे दहशतवाद निपटणार ! – संपादक) स्फोटांनंतर दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली असून `नागरिकांनी घाबरून जाऊ नये’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बाँबस्फोट झाल्यानंतर लोकांची
घरी जाण्यासाठी झुंबड उडाली. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी झाली. “शहरात आणखी १२ ठिकाणी जिवंत बाँब पेरल्याची शक्यता आहे. पोलीस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे बाँब मिळाल्यानंतर ते निकामी करण्यात येतील”, असे कर्नाटकचे पोलीस महासंचालक श्री. श्रीकुमार म्हणाले.
बाँबस्फोटांमधील साहित्य शोधण्यासाठी तपास सुरू
हे बाँबस्फोट घडवून आणण्यासाठी `टायमर’ लावलेल्या क्रूड बाँबचा वापर करण्यात आला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या बाँबस्फोटांची तीव्रता १-२ ग्रेनेड स्फोटांएवढी होती. हे स्फोट घडवून आणण्यासाठी जिलेटीन स्टीक्स वापरल्याचा तसेच अमोनियम नायट्रेटचा वापर केल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. गुन्हे वैद्यकशास्त्राचे पथक व बाँबनिकामी करणारे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
बाँबस्फोटांच्या पार्श्वभूमीवर देशात अतीदक्षतेचे आदेश
बंगळुरूमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, छत्तीसगड, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी दक्षतेचे आदेश देण्यात आले. “मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर इत्यादी शहरांतील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे”, अशी माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. अनामी रॉय यांनी दिली.
सिमीचा हात असण्याची शक्यता
या बाँबस्फोटांची कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही; मात्र बंदी घालण्यात आलेल्या `सिमी’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता केंद्रीय गृह खात्यातील सूत्रांनी वर्तवली. या स्फोटांमध्ये वापरण्यात आलेले साहित्य पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने पुरवले असल्याची शक्यता आहे. (पाकिस्तान भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतला आहे, याचे आणखी किती पुरावे सापडल्यावर भारत सरकार त्याच्या विरोधात पावले उचलणार ! – संपादक)
ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची मदत
बाँबस्फोटांमध्ये ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे”, अशी माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिली. सर्वांनी धार्मिक एकोपा पाळावा, असे सांगत श्री. सिंग यांनी या बाँबस्फोटांचा निषेध केला आहे. (दहशतवादाचा धार्मिक एकोप्याशी काय संबंध ? – संपादक)
कर्नाटकातील हालचालींवर केंद्रीय गृह मंत्रालयाची नजर
बंगळुरूमधील परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्रालय नजर ठेवून आले, अशी माहिती केंद्रीय गृहसचिव श्री. मधुकर गुप्ता यांनी दिली. केंद्रातील गृह खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी कर्नाटकमधील सरकारी अधिकार्यांच्या संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील यांनी या बाँबस्फोटांचा निषेध केला आहे. “परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार कर्नाटक सरकारला सर्वतोपरी मदत करणार”, असे श्री. पाटील म्हणाले.
कर्नाटक सरकारला बाँबस्फोटांची पूर्वकल्पना देण्यात आली होती – जयस्वाल
कानपूर, २५ जुलै (प्रे.ट्र.) – बंगळुरू व हैद्राबाद या शहरांमध्ये दहशतवादी बाँबस्फोट घडवू शकतात, अशी सूचना केंद्र सरकारने कर्नाटक व आंध्रप्रदेश या दोन राज्यांना दिली होती, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. श्रीप्रकाश जयस्वाल यांनी दिली. “माहिती व तंत्रज्ञान शहरे म्हणून ओळखल्या जाणार्या बंगळुरू व हैद्राबाद या शहरांमध्ये दहशतवादी बाँबस्फोट घडवून आणणार, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. या दोन्ही राज्यांच्या सरकारांना दक्षता बाळगण्यासाठी सांगण्यात आले होते. दहशतवाद पसरवण्यासाठी बंगळुरूमध्ये बाँबस्फोट घडवून आणण्यात आले”, असे ते म्हणाले. (जनतेला सुरक्षित जीवन देणे, ही प्रामुख्याने केंद्र सरकारची जबाबदारी असतांना राज्य सरकारवर ढकलणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री ! – संपादक)
हे दुष्टचक्र आणखी किती वर्षे चालणार ?
साल शहर जिवितहानी
१. १३ जानेवारी २००८ जयपूर ६३ ठार
२. २५ ऑगस्ट २००७ हैद्राबाद ४२ ठार
३. १८ मे २००७ मक्का मशीद, हैद्राबाद १३ ठार
४. ८ सप्टेंबर २००६ मालेगाव ३७ ठार
५. ११ जुलै २००६ मुंबई २०० ठार
६. ७ मार्च २००६ वाराणसी २१ ठार
७. २१ ऑक्टोबर २००५ दिल्ली ७० ठार
८. १५ ऑगस्ट २००४ आसाम १६ ठार
९. २५ ऑगस्ट २००३ मुंबई ५२ ठार
१०. १६ फेब्रुवारी १९९८ कोईमतूर ४६ ठार
११. १२ मार्च १९९३ मुंबई २५७ ठार
| मित्रांना पाठवा | 41 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत
|





