सत्तेच्या खेळातील घोडेबाजार ही ५८ वर्षांतील भारतीय लोकशाहीची अधोगती !

नवी दिल्ली, २२ जुलै (वृत्तसंस्था) – आज संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव १९ मतांनी जिंकला. आज ठरावाच्या बाजूने २७५ खासदारांनी मतदान केले, तर त्याच्या विरोधात २५६ खासदारांनी मतदान केले.
अणूकराराच्या मुद्यावर अल्पमतात आलेल्या सरकारला विरोधी पक्षाची मते मिळाली, हे मतदानाच्या वेळी स्पष्ट झाले. (ही मते अर्थव्यवहारातून मिळाली नसतील, हे कशावरून ? – संपादक) मतदानाच्या सुरुवातीला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १ मिनिटांचे भाषण केले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग संसदेला संबोधित करण्यासाठी उभे रहाताच विरोधकांनी सभागृहाच्या हौदात येऊन `पंतप्रधान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. भाषणाच्या सुरुवातीला भाजपच्या खासदारांनी त्यांना लाच
दिल्याचा आरोप केल्याबद्दल डॉ. सिंग यांनी दु:ख व्यक्त केले. “या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल”, असे त्यांनी आश्वासन दिले.
त्यानंतर पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे ४८७ जणांनी मतदान केले, तर ५१ जणांनी मतदानपेटीद्वारे त्यांचे मत मांडले. १० खासदार सभागृहात मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले. (देशाच्या राजकारणाशी निगडित अत्यंत महत्त्वपूर्ण मतदानात सहभाग न घेणारे लोकप्रतिनिधी जनताद्रोही आहेत ! अशांना पुढील निवडणुकीत धडा शिकवा ! – संपादक)
लोकसभेत भाजपच्या खासदारांनी दाखवल्या नोटा !
लोकसभेच्या इतिहासातील लज्जास्पद घटना !
भाजपच्या खासदारांना विकत घेण्याचा सत्ताधार्यांनी प्रयत्न केला, असा आरोप करत आज भाजपच्या तीन खासदारांनी पुरावा म्हणून त्यांना देण्यात आलेली १ कोटी रुपयांचे नोटांचे गठ्ठे थेट लोकसभेच्या अध्यक्षांसमोर नाचवले. या घटनेमुळे लोकसभेत एकच गोंधळ उडाला. याचे थेट प्रक्षेपण सर्व देशाने पाहिले. (असा चालतो घोडेबाजार ! लोकशाहीचे हे अध:पतन रोखण्यासाठी वैचारिक क्रांतीच हवी ! – संपादक)
या घटनेनंतर विरोधी पक्षाचे सदस्य लोकसभेच्या हौद्यात जमा झाले. भाजपचे श्री. फग्गनसिंग कुलस्ते, श्री. अशोक अर्गल व श्री. महावीरसिंग भगोडा या तीन खासदारांनी त्यांना समाजवादी पक्ष तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव अहमद पटेल यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाच्या वेळी सभागृहामध्ये अनुपस्थित रहाण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला. यामध्ये
श्री. अमरसिंग यांचा हात असल्याचा खासदारांचे म्हणणे आहे.
काल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यानंतर १६ तास खासदारांची भाषणे सुरू होती. आज अनेक वरिष्ठ खासदारांची भाषणे झाल्यानंतर श्री. राहुल गांधी यांचे भाषण झाले, त्यानंतर रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांचे भाषण झाले. त्यानंतर श्री. फग्गनसिंग कुलस्ते, श्री. अशोक अर्गल व श्री. महावीरसिंग भगोडा हे भाजपचे तीन खासदार उठले व त्यांनी १ कोटी रुपयांची बंडले सभागृहाला दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष श्री. सोमनाथ चॅटर्जी यांनी संसदेचे कामकाज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थांबवले व प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला. त्यानंतर विविध वृत्तवाहिनींवरील प्रक्षेपणही बंद करण्यात आले.
भाजपचे मध्यप्रदेशातील खासदार श्री. अशोक अर्गल यांना संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी ३ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. श्री. अर्गल यांना `अँडव्हान्स’मध्ये १ कोटी रुपये देण्यात आले, अशी माहिती भाजपचे नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी दिली. “या तीनही खासदारांना ३ कोटी रुपये सभागृहामध्ये आणण्यास सांगितले”, असे श्री. अडवाणी म्हणाले.विश्रांतीगृहातून मतदान करण्यास अध्यक्षांची परवानगी
प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे चार खासदार सभागृहात येऊन मतदान करू शकले नाहीत. त्यांना आहे त्या ठिकाणी मतदान करण्याची परवानगी लोकसभेच्या अध्यक्षांनी दिली. हे चारही खासदार लोकसभेच्या विश्रांतीगृहात आहेत. भाजपचे खासदार श्री. गरोडिया यांची `बायपास’ शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्यांना अँम्बुलन्सच्या साहाय्याने लोकसभेच्या विश्रांतीगृहात आणण्यात आले. त्यांनी विश्रांतीगृहातून मतदान केले. भाजपचे वरिष्ठ नेते तसेच माजी पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीगृहातून मतदान केले.
राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी गदारोळ !
नवी दिल्ली – आज सकाळच्या सत्रात केंद्र सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या चर्चेच्या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार श्री. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणात गरिबी आणि ऊर्जा या मुद्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी `भारतातील गरिबीचा संबंध ऊर्जाप्रश्नाशी कसा जोडला जाऊ शकतो’, असा आक्षेप घेत विरोधकांनी खा. राहुल गांधी यांच्या भाषणात अडथळे आणले. या खासदारांमध्ये विशेषत: बहुजन समाज पार्टीचे खासदार जास्तच आक्रमक झाले होते. या गदारोळामुळे लोकसभेचे अध्यक्ष श्री. सोमनाथ चटर्जी यांना संसदेचे सत्र अर्ध्या तासासाठी स्थगित करावे लागले.
लोकसभेच्या अध्यक्षांनी गोंधळ घालणार्या सदस्यांना वेळोवेळी शांत राहण्याचा व शिस्तीचा सल्ला देऊनही संबंधित सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्याच वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. प्रणव मुखर्जी यांच्यासह अन्य काही काँग्रेसचे खासदार श्री. राहुल गांधी यांच्या मदतीला धावून आले. त्यांनीही संबंधित खासदारांना शांत राहण्याची आणि खा. गांधी यांना आपले बोलणे पुरे करू देण्याची विनंती केली. तथापी या विषयावरील गोंधळ खूपच वाढल्याने आणि बसपचे खासदार ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने श्री. चटर्जी यांनी लोकसभेचे सत्र जेवणाच्या सुटीसाठी दुपारी १.१० च्या सुमारास अर्ध्या तासासाठी स्थगित केले.
भारत चीनपेक्षा मोठा होऊ नये, असे साम्यवाद्यांना वाटते – चिदंबरम
अर्थमंत्र्यांना उशिरा सुचलेले शहाणपण !
नवी दिल्ली – देशातील तरुणपिढीचे भविष्य घडवायचे असेल, तर अणूकरार अत्यावश्यक आहे. आपल्या देशात असे काही लोक आहेत की, त्यांना चीनपेक्षा भारत मोठा होऊ नये, असे वाटते. म्हणून ते अणूकराराला विरोध करत आहेत. अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री श्री. पी. चिदंबरम यांनी लोकसभेत केली. पंतप्रधान
डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ते चर्चेत सहभागी झाले होते.
श्री. चिदंबरम यांनी त्यांच्या भाषणात चीन आणि भारत यांचा तुलनात्मक अभ्यास मांडला. चीनमध्ये सध्या एकूण वीजनिर्मितीपैकी ८० टक्के कोळशापासून, १८ टक्के पाण्यापासून, तर दोन टक्के वीज अणूपासून निर्माण होते. चीनने आता अणूउर्जानिर्मितीवर भर द्यायचा ठरवला असल्याने सन २०३० मध्ये ते वीजनिर्मितीत स्वतंत्र होतील, असे त्यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांच्या या भाषणातील टीकास्त्रामुळे डाव्या पक्षाचे सभासद आणि सत्ताधारी सदस्य यांत परस्परविरोधी घोषणाबाजी झाली.
संसदेचे कामकाज तीनदा स्थगित
आज काँग्रेसचे खासदार श्री. राहुल गांधी यांनी भाषण करायला सुरुवात केल्यावर संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या तीन खासदारांनी पैशांची बंडले दाखवल्यावर कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर ६ वाजता कामकाजाला सुरुवात करण्याची सूचना अध्यक्ष श्री. चॅटर्जी यांनी केली; मात्र कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर लाच प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. समाजवादी पक्षाचे नेते श्री. अमरसिंग यांनी खासदारांना लाच देतांनाची ध्वनीचित्रफीतही उपलब्ध आहे. ती दाखवण्याची मागणीही काही सदस्यांनी केली. या मागण्या श्री. चॅटर्जी यांनी फेटळाल्या व संसदेचे कामकाज संध्याकाळी ६.३० वाजता सुरू करणार असल्याचे जाहीर केले.
सोनिया गांधी यांच्या घरातून पंतप्रधानांचा कारभार ! – भाजप नेते मल्होत्रा यांची टीका
नवी दिल्ली – `पंतप्रधानांचा कारभार सोनिया गांधींच्या निवासस्थानातून चालतो,’ असा आरोप भाजप नेते श्री. विजय मल्होत्रा यांनी आज लोकसभेत केला. डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत भाग घेतांना भाजपचे लोकसभेतील उपनेते श्री. मल्होत्रा यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. सरकारने जनतेच्या विरोधात सर्व निर्णय घेतले, असेही श्री. मल्होत्रा म्हणाले.
सरकारने त्याच्या कारकिर्दीत सीबीआयचा गैरवापर केला. आरोपी खासदारांच्या साहाय्याने केंद्र सरकार विश्वास मत जिंकण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे पंतप्रधानही गुन्हेगार ठरत नाहीत का ?’, असा सवालही त्यांनी त्यांच्या भाषणातून केला. आरोपी खासदारांचा उल्लेख झाल्यामुळे पप्पू यादव व अन्य खासदारांनी प्रचंड गदारोळ सुरू केला. (लोकशाहीत झुंडशाहीने वागणारे व त्यांचे समर्थन करणारे वैचारिक क्रांती अपरिहार्य करतात ! – संपादक) त्यामुळे लोकसभा काही काळासाठी स्थगित करण्यात आली.
मायावती यांच्याकडून समाजवादी पक्षाच्या ६ खासदारांचे अपहरण – अमरसिंग
नवी दिल्ली – उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री श्रीमती मायावती यांनी समाजवादी पक्षाच्या ६ खासदारांना पळवून नेले आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते श्री. अमरसिंग यांनी आज केला. मायावती यांनी त्यांना उत्तरप्रदेश भवनात जबरदस्तीने बंद करून ठेवले आहे. मायावती समाजवादी पक्षामध्ये फूट पाडू पहात आहेत, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.
सरकारला मत देण्यासाठी गुप्तचर यंत्रणेकडून दबाव – ब्रजेश पाठक
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून दबाव आणला जात आहे, असा आरोप बहुजन समाजवादी पक्षाचे श्री. ब्रजेश पाठक यांनी केला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला तशा प्रकारचा आदेश दिला आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेतील काही अधिकारी विरोधी पक्षातील खासदारांच्या घरी जाऊन सरकारला समर्थन द्या, असे सांगून खासदारांवर दबाव आणत आहेत. श्री. पाठक यांनी त्यांच्या जिविताला धोका असल्याचे सांगून लोकसभेच्या अध्यक्षांकडे संरक्षणाची मागणी केली.
पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा – मायावती
नवी दिल्ली – संसद सदस्यांना विकत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न ही एक लांच्छनास्पद घटना आहे. या प्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी बसपच्या नेत्या मायावती यांनी आज येथे केली. आपल्या विरोधात खोटे आरोप तयार करून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून आपल्याला खोट्या खटल्यात गोवण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी या वेळी केला.
ओमर अब्दुल्ला यांची भाजप व डावे यांच्यावर टीका
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आज नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचे भाषण झाले. त्या वेळी त्यांनी भाजपवर टीका केली. “गुजरातच्या दंगलींनंतर मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलो नाही, ही चूक केली”, असे ते म्हणाले. काश्मिरींनी कधीही अमरनाथ यात्रेमध्ये अडथळा आणला नाही व आणणारही नाही. आम्ही धर्मांध भाजपप्रमाणेच मंदिरे व मशिदी पाडत नाही”, असे ते म्हणाले. “भाजपने अमरनाथ देवस्थान मंडळाचा मुद्दा पुढे केला आहे; मात्र ही जमीन आमची आहे. ती आम्ही कदापी देणार नाही. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू”, असे त्यांनी सांगितले. (काश्मीरभूमी मुसलमानांची भूमी आहे, अशा तोर्यात बोलणारे ओमर अब्दुल्ला म्हणे निधर्मी ! – संपादक)
| मित्रांना पाठवा | 13 – वाचक संख्या | छापील प्रत
|