अंनिसचे `थोबाडीत मारा’, तर शिवसेनेचे `टाळया वाजवा’ आंदोलन

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द होण्यासाठी हिंदुत्ववादी सरसावले !

पुणे, १७ जुलै (वार्ता.) – हिंदु धर्मावर घाला घालणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने `थोबाडीत मारा’ आंदोलनाला काल पुण्यात सुरुवात झाली. त्याच पुण्यात अंनिसला प्रत्युत्तर देण्यासाठी येथील हिंदुत्ववादी पुढे सरसावले.

आज शिवसेनेने `टाळया वाजवा’ आंदोलन करून या कायद्याला आपला विरोध पुन्हा स्पष्ट केला. येथील सारसबागेजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळयाजवळ दुपारी ४.३० वाजता हे आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी १ लाख २० हजार टाळया वाजवून लाखो लोकांचा या कायद्याला विरोध असल्याचे दाखवून दिले. (हिंदु धर्मावर घाला घालणारा कायदा आणणार्‍यांना व त्याचे समर्थन करणार्‍यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देणार्‍या शिवसैनिकांचे अभिनंदन ! – संपादक)
शिवसेनेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या कायद्यास आमचा प्रथमपासूनच ठाम विरोध आहे. याशिवाय वारकरी संप्रदायाने गेल्या वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या वाखरी येथे थांबवून त्यांचा विरोध प्रकट केला होता. विधान परिषदेत आमदार श्री. दिवाकर रावते यांनी या कायद्यातील घटनाबाह्य व हिंदुविरोधी बाबी समाजासमोर जाहीररीत्या आणल्या व सातत्याने या कायद्याच्या विरोधात आवाज उठवला त्यामुळे या कायद्यातील १४ कलमे वगळण्यात आली; मात्र अद्यापही अनेक त्रुटी या कायद्यात आहेत. शासनाने जर हा कायदा मागे घेतला नाही तर आम्ही `शिवसेना पद्धतीने’ आमचे आंदोलन आणखी तीव्र करू, हा आमचा शासनाला स्पष्ट इशारा आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रामभाऊ पारीख यांनी केले. या आंदोलनात बारामती संघटक कल्पना थोरवे, विभागप्रमुख बाळासाहेब भामरे, गजानन पंडीत, संजय मोरे, विद्यार्थी सेनेचे अजय शिंदे, उत्तम भूजबळ, दीपक कुंजीर, प्रशांत बधे आदी मान्यवर सहभागी झाले होते.


फाजील आंदोलने करून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्‍न !
आमच्या संतांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सुरुवातीपासून सुरू आहे. त्यामुळे दाभोलकरांसारख्या नास्तिक विचारांच्या मंडळींनी धार्मिक बाबींमध्ये अजिबात ढवळाढवळ करू नये. हा कायदा आणण्यासाठी फाजील आंदोलने करून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्‍न होत आहे, तसेच हा कायदा हिंदु धर्मविरोधी नाही, असा धादांत खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. अंधश्रद्धेच्या संदर्भातील गुन्ह्यांकरता सध्याचे प्रचलित कायदे सक्षम आहेत. पोलीस व न्यायालय यांच्यापैकी कोणाचीही नवीन कायद्याची मागणी नसतांना केवळ दाभोलकरांसारख्या मंडळींनाच हा कायदा कशासाठी हवा आहे, असा प्रश्‍न या पत्रकात उपस्थित करण्यात आला आहे.


* पुण्यातील विभाग व स्थानिक मंदिरे यांठिकाणी पुढील दोन दिवसांत हे आंदोलन शिवसैनिकांनी सुरू ठेवावे, असे आवाहन श्री. रामभाऊ पारीख यांनी या वेळी केले.

|  मित्रांना पाठवा | - वाचक संख्या 55 – वाचक संख्या |  छापील प्रत

 निगडीत वृत्त : धर्मद्रोही अंधश्रध्दा निर्मूलन कायदा