हिंदू संघटित होईपर्यंत अत्याचार संपणार नाहीत ! – उद्धव ठाकरे

मुंबई, १३ जुलै (वार्ता.) – श्री गणेशाची भक्‍ती ही श्रद्धा व शक्‍ती यांच्यामधील धागा आहे; पण आपण संघटित होत नाही, ही खंत आहे. श्री सिद्धीविनायक मंदिरासमोर मोठ्या संख्येने हिंदू जमतात; पण रांगेत पुढे उभ्या असलेल्याची मागच्या हिंदूला ओळख नसते.

 


हिंदू मंदिरांमध्ये एकत्र जमतात; पण ते संघटित नसतात. त्यांचे जोपर्यंत संघटन होत नाही, तोपर्यंत हिंदु धर्मियांवर होणारे अत्याचार थांबणार नाहीत, असे परखड मत शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील सार्वजनिक गणशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना मांडले. या वेळी शिवसेना नेते सर्वश्री मनोहर जोशी, सुभाष देसाई, लीलाधर ढाके, आमदार, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांना शिक्षा दिल्यावर दु:खी
झालेले लोकमान्य टिळक यांना `कोणत्याही विचाराला जनतेचा पाठिंबा असेल, तरच तो यशस्वी होतो’, याचा प्रत्यय आला. मग त्यांनी स्वातंत्र्य व स्वराज्य यांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि हिंदूंना संघटित केले. ही त्यांची चळवळ होती. अशा या उत्सवामध्ये समाजाला मार्गदर्शन करण्याची ताकद आहे, असेही श्री. ठाकरे म्हणाले.

केवळ हिंदु धर्मियांसाठी कायदे करणे खपवून घेतले जाणार नाही !
नेहमी नेहमी पर्यावरणवाद्यांना हिंदूंच्याच धार्मिक बाबी का खटकतात ? त्यांच्यावरच कायद्याचा बडगा का ? हिंदू सहिष्णू आहेत म्हणून ? रात्री दहानंतर पोलीस गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये जाऊन ध्वनीक्षेपक बंद करतात. जे कायदे हिंदूंसाठी, तेच कायदे इतर धर्मियांसाठीही लावले पाहिजेत. गणेशोत्सव मंडळांनीही उत्सव जल्लोषात साजरा करावा; पण त्याचबरोबर उत्सवाचे पावित्र्य टिकवून ठेवावे. विसर्जन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी समुद्रकिनार्‍यांवर मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी फेरफटका मारावा. तेथे गेल्यावर त्यांना ज्या श्री गणेशाला आपण भक्‍तीभावाने पुजलेले असते, तो नवसाला पावल्याने त्याची मनोभावे पूजा केली असते, त्याच श्री गणेशमूर्तींच्या अवयवांचे तुकडे इतरत्र पसरलेले आढळून येतील. याही गोष्टी मनाला क्लेश देतात; पण या सर्वच गोष्टी कायद्याने थांबवता येणार नाहीत. त्यासाठी चर्चा झाली पाहिजे. प्रबोधन केले पाहिजे, असे श्री. ठाकरे यांनी पुढे सांगितले.
`गणपति दूध पितो’, याची चेष्टा होते; मग येशूच्या चित्रातून रक्‍त आले त्याला काय म्हणाल ?
`गणपति दूध पितो’, हा आजही चेष्टेचा विषय बनत आहे. त्याची चेष्टा केली जात आहे. श्री. मनोहर जोशी यांच्या घरचा गणपति दूध पितो, तर तुम्हाला त्याचे काय करायचे आहे ? जोशी आणि त्यांचा गणपति, काय ते बघून घेतील. तुम्हाला त्याचा त्रास का होतो ? माहीम चर्चमध्ये येशूच्या चित्रातून रक्‍त निघत होते, माहीमच्या समुद्रकिनार्‍यावरील पाणी गोड झाले, या सगळयाला काय म्हणाल ? अर्थात अंधश्रद्धा
गाडल्याच पाहिजेत. त्याबाबत दुमत नाही, असेही ते म्हणाले.

गणेशोत्सव मंडळांनो, उत्सवाचे पावित्र्य जपा !
श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, गणेशोत्सव मंडळांनी या उत्सवाचे पावित्र्य जपले पाहिजे. मंडपामध्ये वर्तन योग्य असायला हवे. उत्सवाचा खर्च भागवण्यासाठी जाहिराती घेतांना पान, तंबाखू, चित्रपट यांच्या जाहिराती घेऊन तुम्ही काय साध्य करत आहात ? आता या वर्षी याही वाईट गोष्टींचे विसर्जन करा ! (गणेशोत्सवाचे पावित्र्य भंग करणार्‍या वाईट गोष्टींच्या विरोधात प्रबोधन करणारे श्री. उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन ! – संपादक)

दैनिक सनातन प्रभात

 

.

Leave a Reply