पाठ्यपुस्तकात धार्मिक विधींना अंधश्रद्धा ठरवणारा मजकूर अंतर्भूत करणे, हे शिक्षण खात्याचे महत्पाप !
शालेय शिक्षण खात्याचा धर्मद्रोह !
मुंबई, १३ जुलै (वार्ता.) – यंदाच्या वर्षी शालेय शिक्षण खात्याने इयत्ता १० वीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामध्ये `व्यक्तीमत्त्व विकास’ या नव्या विषयाचा समावेश केला आहे. त्यासाठी नवनीत प्रकाशनाने प्रकाशित केलेली प्रा. चंद्रकांत मर्गज यांनी लिहिलेली `व्यक्तीमत्त्व विकास मार्गदर्शन व कार्यपुस्तिका’ ही स्वाध्यायमाला शालेय शिक्षण खात्याने प्रमाणित केली आहे.
यात `मूल्यशिक्षण’ या भागातील `वैज्ञानिक दृष्टीकोन’ या ५ व्या प्रकरणात ज्योतिषशास्त्र, यज्ञ, मंत्रतंत्र, पूजापाठ इत्यादी सर्व बाबी थेट अंधश्रद्धा असल्याचे म्हटले आहे. (अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या कोवळया मनात असलेल्या श्रद्धांचे भंजन करून शालेय शिक्षण खात्याने घटनेने जनतेला दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत जनतेने शालेय शिक्षण खात्याला जाब विचारायला हवा ! – संपादक) गुजरातमध्ये भूकंप झाला. तसा पुन्हा होऊ नये; म्हणून लोकांनी कोटीयज्ञ केला. सुरतमध्ये प्लेगची साथ आली. तशी आपल्याकडे येऊ नये; म्हणून लोकांनी सत्यनारायणाची पूजा घातली. `गणपति दूध पितो’ ही अफवा वार्यासारखी पसरते आणि लोक गणपतीला दूध पाजायला रांगा लावतात. ग्रहणाच्या दिवशी गरोदर स्त्रीने काहीही चिरू नये वा कापू नये इत्यादी गैरसमजुती अजूनही नाहीशा झालेल्या नाहीत. (या सर्व गैरसमजुती आहेत, हे प्रा. चंद्रकांत मर्गज व त्यांचे सदर धर्मद्रोही पुस्तक अभ्यासक्रमासाठी नेमणारे शालेय शिक्षण खाते यांनी कशाच्या आधारावर ठरवले ? स्वत:ला ज्या विषयातील काहीही कळत नाही, तो विषयच चुकीचा आहे, असे म्हणणे कोणत्या विज्ञाननिष्ठेत बसते ? – संपादक) हे असे का होते ? कारण आपल्यात अजून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजलेला नाही’, असे सांगत प्रा. चंद्रकांत मर्गज यांनी या प्रकरणामध्ये यज्ञ, सत्यनारायणाची पूजा, ग्रहणामागील अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन यांना अंधश्रद्धा ठरवले आहे. (अश्रद्धेची झापडे डोळयांवर बांधून तर्कबुद्धी गहाण ठेवणार्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या गप्पा मारणे, याहून मोठा विनोद नाही ! – संपादक) विज्ञान आपल्याला काय शिकवते ? कोणती घटना का घडते, हे आपल्याला विज्ञान समजावून सांगते. पाण्याला ठराविक उष्णता दिली की, त्याची वाफ होते. पाण्याला उष्णता न देता केवळ यज्ञयाग करून, मंत्रतंत्र करून किंवा पूजाअर्चा करून पाण्याची वाफ होऊ शकत नाही; म्हणजेच कोणत्याही घटनेला निश्चित असे कारण असते आणि जगभर ते सत्य असते, असे मानणे हा वैज्ञानिक दृष्टीकोन होय. राहू-केतूने ग्रासल्यामुळे ग्रहणे होतात, असे नसून ग्रहणे हा चंद्र-पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ आहे, हे ओळखले पाहिजे. (हा सावल्यांचा खेळ विशिष्ट वेळी विशिष्ट काळीच कसा घडून येतो, त्याचे नियोजन कधीच कसे चुकत नाही, हा खेळ कोण नियंत्रित करतो, याचे उत्तर प्रा. मर्गज यांच्याकडे आहे का ? – संपादक) केवळ देव सांगतो म्हणून वा केवळ धर्म सांगतो म्हणून वा एखादा बाबा सांगतो म्हणून कशावरही विश्वास ठेवू नये, असे या धड्यात म्हटले आहे. (आपली आई सांगते म्हणून `हेच आपले वडील आहेत’, यावर सारे जग विश्वास ठेवते. जग हे विश्वास व श्रद्धा यांवरच चालते. असे असतांना पुढील पिढीमध्ये कमालीची घातक अश्रद्धा निर्माण करणारे प्रा. मर्गज ! – संपादक) पुढे मात्र या धड्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्यासाठी दैनंदिन स्वच्छतेच्या सवयींचा आग्रह धरलेला आहे. त्यांत उपरोक्त गोष्टींचा सुतराम उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याखाली संतांचे वचन दिलेले आहे. त्यात `प्रचीतिवीण जे बोलणे । ते अवघेचि कंटाळवाणे । प्रचीतिवीण ज्ञान सांगणे । या नाव भ्रम ।’ – संत रामदास, असे वचन दिले आहे. (या वचनातून साधना करून अध्यात्मशास्त्र अनुभूतीच्या माध्यमातून समजून घ्या, असा दृष्टीकोन संत रामदासस्वामींनी दिला आहे. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास न करता संतांच्या श्लोकांचा स्वत:ला हवा तसा अर्थ काढून लोकांच्या श्रद्धांचे भंजन करणार्यांना श्रद्धाळूंनी वेळीच रोखायला हवे ! – संपादक)
शासनाने बंद केलेला वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प पाठ्यक्रमात !
`महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने दोन वर्षांपूर्वी वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाच्या नावाखाली शाळाशाळांमध्ये परीक्षा घेतल्या होत्या. त्यामध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे कर्मकांड, धार्मिक विधी, उपासना, ज्योतिषशास्त्र इत्यादींबाबत विद्यार्थ्यांमध्ये विकल्प निर्माण करणारे होते. याला हिंदु जनजागृती समिती व पालक संघटना यांनी संघटितपणे सनदशीर मार्गाने विरोध केला होता. त्याची दखल घेऊन तत्कालीन शिक्षण सचिव श्री. जयराज फाटक यांनी ताबडतोब राज्यातील सर्व शाळांमध्ये हा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला होता. या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या आक्षेपार्ह प्रश्नांचे संदर्भ असलेले प्रकरण सदर इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेले आहे.


