मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – उत्तरप्रदेश व बिहार येथून बेकायदेशीरपणे येणार्या लोंढ्यांच्या तावडीत संपूर्ण महाराष्ट्र सापडला आहे. या परप्रांतियांना शिधापत्रिका, रिक्शा व टॅक्सी यांचे परवाने, वास्तव्याचा दाखला आदी परवाने देतांना चिरीमिरीसाठी स्वत:ला विकू नका. तुमच्या या कृत्यांनी यापूर्वी परप्रांतियांची दादागिरी राज्याने अनुभवली आहे.
यापुढे परप्रांतियांना असे परवाने देतांना सर्व नियम आणि कायदे यांचे पालन करा. माझा पक्ष व मी या अधिकार्यांच्या पाठीशी असू. या संबंधित अधिकार्यांनी त्यांचा कारभार महिन्याभरात सुधारावा अन्यथा मनसेच्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी दिला. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यगृहातील मनसेच्या विविध पदाधिकार्यांच्या मेळाव्यास संबोधित करतांना श्री. राज ठाकरे म्हणाले, “उत्तरप्रदेश व बिहार येथून येणार्यांना सर्व प्रकारचे परवाने अधिकार्यांच्या मदतीने सहज मिळतात. मग हे परप्रांतीय शासनाच्या आरक्षित जागा व पदपथ यांवर झोपड्या बांधून बेकायदेशीर धंदे सुरू करतात. नंतर बेकायदेशीर देशी शस्त्रे आणून त्यांची दादागिरी सुरू होते. राजकीय पक्षांत शिरकाव करत ते आमदार व खासदार बनतात. हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस हे राज्य त्यांच्या ताब्यात जाईल व पुढची पिढी आपल्याला कदापी माफ करणार नाही, असा इशारा असणारे निवेदन राज्यातील
सर्व अधिकार्यांना पक्षाच्या पदाधिकार्यांमार्फत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य केंद्रशासनाकडे भरत असलेल्या करापैकी फार थोडा पैसा राज्याला मिळतो. उलट उत्तरप्रदेश व बिहार यांना अधिक पैसा मिळत असूनही तेथे विकास नाही.”


